वीज,मालमत्ताकरांपाठोपाठ अकृषकचा दट्टा...... शहरातील नागरीक हैराण : लोकप्रतिनिधी चिडीचूप : प्रशासनाद्वारे दंडेलशाही
       परभणी,दि.22(मोहम्मद वारी जिल्हा प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने गेल्या दोन-अडीच वर्षांपासून शहरासह जिल्हा अक्षरशः होरपळून निघाला असतांनासुध्दा मार्चएंडच्या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेसह वीज वितरण कंपनी पाठोपाठ महसूल खात्यानेसुध्दा सील ठोकण्याच्या धमक्या देवून सक्तीने कर वसुलीचे सत्र सुरु करीत सर्वसामान्य नागरीकांना सळो की पळो करुन सोडले आहे.
       विशेष म्हणजे गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून सक्तीच्या वतूलीचे म्हणजे दंडेलशाहीचे हे प्रकार खुलेआम सुरु असतांना सत्तारुढ व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी तथा पुढारी या प्रकाराविरोधात ओळीनेसुध्दा आक्षेप न नोंदविता अक्षरशः मूग गिळून गप्प बसले आहेत.
         शहरासह जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार दोन-अडीच वर्षांपासून पूर्णतः कोलमडले आहेत. विशेषतः कोरोनाच्या आपत्तीत म्हणजे पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात म्हणजेच दीड-दोन वर्ष सततचा लॉकडाऊन, एका पाठोपाठ एक निर्बंधांमुळे सर्वच क्षेत्र आर्थिकदृष्ट्या पूर्णतः अभूतपूर्व अडचणीत सापडले आहेत. यातून कसबसे बाहेर येवू असे अपेक्षित असतांना गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाच्या तीसर्‍या लाटेनेही दहशतीचे वातावरण पसरवले. त्यामुळे पुन्हा निर्बंध व मर्यादा येवून पडल्या. परिणामी सर्व क्षेत्रातील सर्वसामान्य नागरीक अक्षरशः हतबल झाला.
       आर्थिकदृष्ट्या मागास असणार्‍या परभणी जिल्ह्यात हळूहळू हे व्यवहार आता पूर्वपदावर येतील, असे आशादायी चित्र उद्भवले असतांना सरकारी व निमसरकारी गेल्या तीन - चार महिन्यांपासून ऐनकेन प्रकारे कर वसूलीचा धूमधडाका सुरु केला आहे. वीज वितरण कंपनीने चक्क मोहिम राबवून आतापर्यंतची बिले भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत केला जाईल, अशा धमक्या देवून मोठ्या ताफ्यानिशी संपूर्ण जिल्ह्यात मोहिम राबविली. अन् सक्तीने कोट्यवधी रुपये वसूल केले. सर्वसामान्य नागरीकांसह प्रतिष्ठितसुध्दा प्रतिष्ठेपोटी, स्वाभिमानापोटी वीजबिले भरुन मोकळी झाली. या कंपनी पाठोपाठ महानगरपालिका प्रशासनानेही काडीमात्र सुविधा पुरविल्या नसतांनासुध्दा महापालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना आव्वा की सव्वा कर लादून त्यावर शास्ती आकारुन तसेच पर्यावरण, वृक्ष लागवड, स्वच्छता, शिक्षण वगैरे आठ प्रकारचे कर लादून हजारो, लाखो रुपयांच्या नोटीसा बजावल्या. पाठोपाठ पथके स्थापन करीत वसूलीचाही धूमधडाका सुरु केला. महापालिकेचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर यांनी या सक्तीच्या विरोधात ओळीनेही आक्षेप घेतला नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या पथकांनी चोहोबाजूंनी दररोज किमान 25 लाख रुपये वसूल करीत करोडो रुपये वसूल केले. सर्वसामान्यांनी स्वाभिमानापोटी तर प्रतिष्ठितांनी प्रतिष्ठेपोटी आव्वा की सव्वा मालमत्ता कराच्या रक्कमा अदा केल्या.
         वास्तविकतः महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. या गोष्टीचा तडाखा सर्वच पक्षांना बसणार आहे. असे असतांनासुध्दा शहरातील सत्तारुढ व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी ओळीनेही विरोधाचा सुर काढला नाही. आंदोलने तर दूरच राहीली. आता महापालिकेपाठोपाठ महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी अकृषक कराच्या वसूली करीता मैदानात उतरले आहेत. जागीच नोटीसा, पाठोपाठ सील ठोकण्याची भाषा, सक्तीने वसुली हे प्रकार सर्रास सुरु झाले आहेत.
         महापालिकेच्या चोहोबाजूंच्या वसाहतीत मनपा व महसूलची पथके दिवसरात्र वसूलीच्या मोहिमेवरच आहेत. सर्वसामान्य नागरीकांना, प्रतिष्ठितांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडले जात आहे. सरकारी यंत्रणांच्या या दंडेलशाहीच्या प्रकाराने नागरीक आर्थिकदृष्ट्या पिळल्या जावू लागले आहेत, हतबल आहेत. गंमत म्हणजे राजकीय क्षेत्रातील बड्या मंडळींच्या थकबाकी विरोधात काडीमात्र कारवाई होत नाही, हेही वास्तव आहे.
        शिवसेनेचे खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान आमदार डॉ. राहुल पाटील, ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, हे सत्तारुढ असो की, आमदार सौ. मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे हे लोकप्रतिनिधी तसेच शिवसेनेसह भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनीसुध्दा या विरोधात आजपर्यंत ब्र काढला नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात या सक्तीच्या वसूलीने सर्वसामान्य नागरीकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या नागरीकांना कोणीही वाली राहीले नाही. स्वाभिमानापोटी, प्रतिष्ठेपोटी वाट्टे तो कर अदा केला जातो आहे. शास्तीच्या नावाखाली लूट सुरु आहे. परंतु, या कोणालाही पाझर फुटत नाही, हे परभणीकरांचे दुर्देव आहे. एकाच वेळी तीन-तीन पध्दतीने सक्तीच्या वसूली विरोधात आता कोण उभा राहील? हाच एक यक्ष प्रश्‍न आहे.

Post a Comment

Previous Post Next Post