डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणी आणखी एकास अटक, आज करणार न्यायालयात हजर मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (दि.16) यशवंत म्हस्के यास अटक केली आहे. दरम्यान, चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने संदीप वाजे यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संदीपची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांनी लिहिलेले पत्र आणि चॅटिंगच्या आधारे डॉ. वाजेंचा खून संशयित पती संदीप वाजे याने केल्याचा संशय आहे. मात्र, त्याने खुनासंदर्भात अद्याप कबुली दिलेली नाही. चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीत त्याच्याकडून ठोस पुरावे मिळालेले नसल्याचे समजते. कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी (दि.16) न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वाडीवर्‍हे पोलिसांनी या प्रकरणात दुसरा संशयित म्हस्के याला अटक केल्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

म्हस्के याचा खून प्रकरणात कसा सहभाग आहे याबाबत चौकशी करण्यासाठी त्याला गुरुवारी (दि.17) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, संशयित संदीप वाजेच्या वकिलांनी सांगितले की, संदीप वाजेविरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे नाही. त्याचप्रमाणे संदीप याने न्यायालयात माझी नार्को टेस्ट करा व मला आणि माझ्या पत्नीला न्याय द्या, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांची वाताहत झाली असून, न्याय न मिळाल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा संदीपने दिला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आम्ही संदीपच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे वकिलांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post