बीड : छत्रपती शिवाजी महाराजांचे १५ हजार स्क्वेअर फुटात साकारले रांगोळीचित्र बीड, : कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा… या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवरायांनी गडकिल्ले उभारुन स्वराज्याची निर्मिती केली. ही मुख्य संकल्पना यावर्षीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची असल्याचे सांगुन विजयसिंह पंडित म्हणाले की, पंधरा हजार चौरस फुट जागेत १७ ब्रास बेसॉल्ट दगड व रंग वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक रेखाचित्र साकारण्यात आले आहे. महाआरती, अभिवादन आणि रांगोळीचित्राचे भव्य अनावरण छत्रपती शिवाजी महाराज नगरी येथे होणार असुन या प्रसंगी या प्रसंगी शिवप्रेमी नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले.

राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा आयोजना बाबत गेवराई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवजन्मोत्सव कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातुन मागील अनेक वर्षापासुन नेत्रदिपक आणि शिस्तबद्ध शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. वर्गणीच्या नावाखाली सुरु असलेली खंडणी वसुली, डिजेच्या तालावर नाचणारी मद्यधुंद तरुणाई अशा अनिष्ठ प्रथा बंद करुन त्यांनी शिवजयंतीचे शिवजन्मोत्सवात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला.

आजवर शिवगर्जना, राजा शिवछत्रपती, शंभुराजे या महानाट्यांसह आकर्षक व नेत्रदिपक देखावे, महाआरोग्य शिबीर, मॅरेथॉन, वकृत्व, रांगोळी व चित्रकला या सारख्या राज्यस्तरिय स्पर्धांचे आयोजन शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले. मागील दोन वर्ष कोरोना सारख्या संकटामुळे यामध्ये खंड पडला होता. पुुन्हा नव्या जोमाने कोरोना विषयक नियमांचे पालन करत आकर्षक व अनोखा शिवजन्मोत्सव सोहळा गेवराई शहरात आयोजित करण्यात येणार आहे. या बाबतची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन विजयसिंह पंडित यांनी दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना विजयसिंह पंडित म्हणाले की, शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप या विचारातुन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या संकल्पनेतुन पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम या शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज नगरीमध्ये पंधरा हजार चौरस फुट जागेत सतरा ब्रास बेसॉल्ट दगड, २५० किलो चुना आणि १६० किलो काळा रंग वापरुन गेवराईचे भुमिपुत्र सुप्रसिद्ध कलाकार उद्देश पघळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मागील सात दिवसांपासुन कष्ट घेवुन छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र साकारले आहे.

या अनोख्या उपक्रमाची नोंद वल्ड रेकॉर्डस ऑफ इंडिया या संस्थेने घेतली असुन या विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र लवकरच त्यांच्याकडुन मिळणार आहे. या रेखाचित्राचे भव्य अनावरण शनिवार दि. १९ रोजी सकाळी १० वा. होणार असुन त्यापुर्वी ९:३० वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते महाआरती होणार असुन या प्रसंगी अभिवादन सोहळ्याला शिवप्रेमी नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष महेश मोटे, कार्याध्यक्ष विठ्ठल पवार, प्रथमेश वाव्हळ, किशोर वादे, शेख बाबुभाई (जेके), सचिव गजानन पिसाळ, सहसचिव वैभव दाभाडे, सह कोषाध्यक्ष शेख जुनेद, दिपक आतकरे, राधेशाम येवले, गोरखनाथ आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post