खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश

बीदर-नांदेडदरम्यान नवीन रेल्वे लाईनला मंजुर


नांदेड|
नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अगदी पहिल्या टप्प्यात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नांदेड बीदर रेल्वेमार्गाला तत्त्वतः मंजुरी मिळवून घेण्यात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना यश आले होते. त्यासाठी पिंक बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. मात्र या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली नव्हती. ही मंजुरी मिळावी आणि  सर्वेक्षणाच्या अनुषंगाने कार्यवाही व्हावी यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून आता नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात नांदेड - बिदर या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नांदेड बिदर रेल्वे मार्ग येत्या काही वर्षात सुरू होईल असा विश्वास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

नांदेड - बिदर रेल्वे चा प्रश्न मार्गी लागावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही यासाठी लढा उभारला होता. मात्र राज्यात आणि केंद्रात अनेक दशके सरकार असलेल्या काँग्रेसला या मार्गावर रेल्वेलाईन आणण्यासाठी यश मिळाले नव्हते. मात्र खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी आपले शब्द खर्ची घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष काम कधी होणार आणि अर्थसंकल्पात याची तरतूद व्हावी यासाठीही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यशस्वी प्रयत्न चालविले. 

संसदेच्या अधिवेशनातही या अनुषंगाने त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. शीख बांधवांसाठी आणि अन्य दळणवळणाच्या वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्वपूर्ण राहणार असल्याने या मार्गाला मंजुरी मिळविण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी परिश्रम घेतले. या परिश्रमाला यश आले असून रेल्वे अर्थसंकल्पात बीदर - नांदेड या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली आहे आणि मुदखेड-परभणी विद्युतीकरण व दुहेरीकरणालाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाबी नांदेडकरांसाठी दिलासा देणारा ठरल्या आहेत.

रेल्वे अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला काय मिळते, काय पदरात पडते याकडे सगळ्यांचे लक्ष होते. बुधवारी रेल्वे अर्थसंकल्पाचा पिंक बुक हाती लागला. त्यानुसार बीदर -नांदेड या १५५ कि.मी. अंतराच्या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी देण्यात आली असून यासाठी सुमारे २ हजार २५२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली. तसेच मुदखेड-परभणी (८१.४३ कि.मी.) दरम्यानच्या दुहेरी लाईनसाठी ३० कोटी २० लाख रुपये अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले. नांदेड मंडळ अंतर्गत चौकीदार नसलेल्या फाटकांवर चौकीदार नियुक्तीसाठी १०० कोटी रुपये मंजूर झाले. याशिवाय नादेड डिव्हीजनअंतर्गत सबवेचे रेल्वे क्रॉसिंग, भोकर-हदगाव, परभणी-पिंगळी रोड, गंगाखेड पोखर्णी, चोंडी-वसमत, हिंगोली-धामनी रोड दरम्यान उंच रस्ते पूल बांधण्यास मान्यता देण्यात आली. 

याशिवाय मुदखेड आदिलाबाद-पिपळखुटी, विकाराबाद परथ या दरम्यान लातूर-तिरुपती, नांदेड पंढरपूर रेल्वेचा प्रस्ताव मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. रिनीव्हललाही मान्यता देण्यात आले. तसेच मनमाड-मुदखेड दरम्यान ८ पुलांचे पुनर्निर्माण केले जाणार आहे. मनमाड-परभणी-नांदेड-सिकंदराबाद गुढगल-घोड-गुंटकल या दरम्यान सिग्नल आणि दूरसंचार संबंधिताच्या कार्यालयातही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. देश व विदेशातील लाखो शीख बांधव नांदेडला गुरुगोविंदसिंघजी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. 

नांदेडहून भाविक बीदरलाही जातात. त्यामुळे नांदेड-बीदर हा रेल्वे मार्ग मंजूर करावा, अशी मागणी शीख भाविकाची होती. या मागणीची दखल घेवून मंगळवारी सादर झालेल्या रेल अर्थसंकल्पात १२५१ कोटी रुपये खर्चाच्या नांदेड- बीदर मार्गाला मंजूरी देण्यात आली आहे. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड - बिदर रेल्वे मार्गासह मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्नांसाठी सातत्याने संसदेमध्ये आवाज उठवला आहे. जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिले तो विश्वास सार्थ करण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे हे प्रयत्न फळाला आल्याचे दिसून येते.

Post a Comment

Previous Post Next Post