पद्मश्री इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने
नांदेड येथील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय परिवर्तन होण्याची नांदी

जगात कायमचं असं काही नसतं, परिवर्तन किंवा बदल होणं हेच कायम असत असं म्हटलं जातं. जीवनातील प्रत्येक क्षेत्राला हा नियम लागू  आहे. वैद्यकीय क्षेत्र या नियमाला अर्थातच अपवाद असू शकत नाही. दि.14 मे 2022 रोजी नांदेड शहरात पद्मश्री इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच भूमिपूजन होत आहे, त्या निमित्ताने गेल्या चार दशकात येथील आरोग्य सुविधांमध्ये कसा बदल होत गेला याचा आढावा घेणे औचित्यपूर्ण ठरेल.
आरोग्य सुविधांच्या आघाडीवर गेल्या चार  दशकात आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतात. याचं मुख्य कारण म्हणजे रुग्णाची तपासणी, निदान आणि उपचार पद्धतीवर आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भारी प्रभाव झालेला आहे. पूर्वी एकच डॉक्टर, लहान मुलांना, मोठ्या माणसांना, गर्भवती महिलांना, अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना वगैरे सगळ्या पेशंटना तपासून यथाशक्ती उपचार करत असे. अगदीच आपल्या आटोक्याबाहेरील केस असेल तर मग  मोठ्या सरकारी दवाखान्यात पाठवत असे. यालाच फॅमिली डॉक्टर असं म्हटल्या जात असे. या फॅमिली डॉक्टरला अनेक कुटुंबासाठी फक्त डॉक्टर नाही तर, गाईड-फ्रेंड- फिलॉसॉफरची भूमिका घ्यावी लागत असे. डॉक्टर-पेशंट च्या दृष्टिकोनातून ते दिवस खूप चांगले होते असं आजही म्हटलं जातं.
नांदेडात, अशा फॅमिली डॉक्टरच्या यादीत आदरणीय डॉ.राजेंद्र महाजन, डॉ.प्र.दि.पुरंदरे आणि डॉ. सोहनलाल अवस्थी यांची नांवे अग्रक्रमाने घेतली पाहिजेत. त्यानंतर (कै.) डॉ.ना.गो.भालेराव, (कै.) डॉ.वाडेकर, (कै.) डॉ.मोतेवार, (कै.) डॉ.नळदकर, (कै.) डॉ.बजाज इत्यादींचे आधुनिक वैद्यकशास्त्रीय उपचार पद्धतीची नांदेड शहरात पायाभरणी केली. वरील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी स्वतःचे नर्सिंग होम सुरू करून रुग्णसेवा केली.  
त्यानंतर स्वतःचं, एकट्याचं रुग्णालय निर्माण करून, एक हाती 24 तास रुग्णसेवा देण्याचं काम करण्यापेक्षा एकाच स्पेशालिटीचे चार लोक एकत्र येऊन रुग्णालय सुरू केल्यास आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढू शकते, कोणत्याही एका डॉक्टरवर सतत कामाचा ताण राहणार नाही आणि पेशंट्सना देखील 24 तासात कोणत्याही वेळेस एक पदव्युत्तर डॉक्टरचं मार्गदर्शन मिळेल ही संकल्पना खर्‍या अर्थाने नांदेडमध्ये ‘अश्विनी ’ ग्रुपने मांडली.
काही वर्षानंतर, एकाच स्पेशालिटीचे चार डॉक्टर एकत्र येऊन हॉस्पिटलची सुरुवात करण्याची संकल्पना मागे पडली आणि विविध स्पेशालिटीचे अनेक डॉक्टर्स एकत्रित येऊन ‘मल्टीस्पेशालिटी’ हॉस्पिटल सुुरू करण्याचा पायंडा सुरु झाला. अशा हॉस्पिटल्समध्ये एकाच छताखाली विविध स्पेशालिटीच्या डॉक्टरची भेट, गरज पडल्यास लॅबोरेटरी, सोनोग्राफी, सी टी स्कॅन, एमआरआय, ऑपरेशनची सोय, ऑपरेशन झाल्यानंतर गंभीर रुग्णांसाठी आयसीयू बॅकअप वगैरे अनेक सोयी उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली. अशी अनेक रुग्णालये शहरवासीयांच्या रुग्णसेवेत कार्यरत आहेत.
नांदेड येथे आज फक्त नांदेडचे रुग्ण नसतात, तर लगतच्या जिल्ह्यात व राज्यातून रुग्ण येतात. याचं श्रेय फक्त खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या डॉक्टरांना दिलं पाहिजे, असं नाही. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, महानगरपालिकेची रुग्णालये यांचे देखील मोलाचे योगदान राहिले आहे. 
साधारणतः मागील चार दशकातील नांदेड शहरात पुरविल्या जाणार्‍या वैद्यकीय सेवा-सुविधांचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येत की, मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड येथे खाजगी क्षेत्रात विविध विषयांना अनुसरून रुग्णउपयोगी खूप चांगल्या प्रतीचं काम होत आहे. ज्या वैद्यकीय सुविधांसाठी पूर्वी मुंबई, पुणे, हैद्राबादसारख्या शहरात जावं लागायचं त्या जवळपास सर्व सुविधा आज नांदेड मध्ये उपलब्ध आहेत असं म्हणता येईल. विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, आपलं कौशल्य पणाला लाऊन रुग्णांवर उपचार करतात. नांदेडची भौगोलिक परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. या शहरात अनेक वर्षांपासून वैद्यकीय सल्ला, विविध तपासण्या, उपचार या कारणांसाठी लगतच्या  हिंगोली, लातूर, परभणी, या मराठवाड्यातील  जिल्ह्यातून लोक येतात.  विदर्भातील पुसद, उमरखेड या प्रमुख शहरातून, शेजारी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, बांसवाडा, कर्नाटक राज्यातील भालकी, बिदर, हुमनाबाद वगैरे शहरातील लोक नांदेडला वैद्यकीय कारणांसाठी येण्याचा शिरस्ता आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्याच्या सीमेवरील, नांदेड हे एक प्रमुख ‘मेडिकल हब ’ झालेलं आहे, असं म्हणावयास हरकत नाही. नांदेडला या अनेक विविध शहरातून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, स्पेशालिस्ट डॉक्टर्सकडून उपचार करून समाधानाने परत जाणार्‍या रुग्णांची संख्या ही वाढतचं जाणार आहे. सध्या समाजात आरोग्य विम्याविषयी जागरूकता भरपूर वाढली आहे. या सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना एकाच छताखाली नेहमी लागणार्‍या, उपचारासाठी कठीण असणार्‍या आजारांसाठी, कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या धर्तीवर कार्य करणार्‍या आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून पाऊले उचलणार्‍या एका भव्य अशा हॉस्पिटलची नांदेडला आवश्यकता होती. पद्मश्री इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये सध्या न्युक्लियर स्कॅन, पेट स्कॅन, हाय एन्ड एम आर आय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करून उपचार करण्याच्या सोयी अजून उपलब्ध नाहीत. दुर्बिणीद्वारे केल्या जाणार्‍या शस्त्रक्रिया सध्या नांदेडमध्ये केल्या जातात, पण त्यातही अजून उच्च दर्जा गाठण्यासाठी वाव आहे. मेडिकल, सर्जिकल, रेडिएशन ऑन्कोलॉजी या विषयात अजून दर्जेदार काम होण्यासाठी संधी आहे. कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा घडवून आणण्याच्या तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे. या आघाडीवर देखील सुधारित पद्धतीने अजून काम करता येण्यासारखं आहे. पद्मश्री इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काही रुग्णांना आवश्यक असलेले ‘बायपास’ ऑपरेशन, बर्न झालेल्या काही रुग्णांसाठी आवश्यक असलेली प्लास्टिक शस्त्रक्रिया, फेशिओ मॅक्सिलरी शस्त्रक्रिया, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीशी संबंधित उपचार, या आणि अशा अनेक उपचार पद्धतीने रुग्णांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचे उद्देश समोर ठेऊन चारशे बेड्सचं हे भव्य हॉस्पिटल नजीकच्या भविष्यात कार्यरत होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात केलेल्या, नव्या जोमाने काम करणार्‍या तरुण डॉक्टर्सना स्वतःची कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक न करता या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
या हॉस्पिटलची खूप आणि वेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रशस्त जागेत एक टोलेजंग हॉस्पिटलची इमारत ‘ग्रीन बिल्डिंग’ या संकल्पनेतून साकार होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील ही नवीन अशी संकल्पना आहे. सौरऊर्जेचा उष्णता आणि प्रकाश मिळवण्यासाठी वापर, नैसर्गिक वायुवीजन, निर्मितीसाठी कमी ऊर्जा लागणार्‍या तसेच पर्यावरणास पूरक ठरणार्‍या वस्तूंचा बांधकामात वापर, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, इमारतीतील हवेचा दर्जा योग्य राखणे, पर्जन्य जलसंधारण, सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर, घन कचर्‍यापासून खत व बायोगॅस या तत्वांवर या हॉस्पिटलचे बांधकाम होणार आहे. आज आपल्याला शहरात, जवळपास प्रत्येकाकडे दुचाकी किंवा कार आहे, पण ‘पार्किंग’ ची समस्या मोठी आहे. पार्किंगसाठी प्रशस्त जागा हे या हॉस्पिटलच्या इमारतीचं वेगळेपण रहाणार आहे. औषधी किंवा तपासणीसाठी रक्त-लघवीचे नमुन्यांची ने आण करण्यासाठी आजकाल हवेच्या दाब उपयोगात आणून एक विशिष्ठ प्रकाराची पाईपलाईनची व्यवस्था केली जाते, त्यामुळे मनुष्यबळाची बचत होऊन वेळ देखील वाचतो. ही (झपर्शीारींळल र्ढीलशी षेी ढीरपीिेीीं ेष चशवळलळपश रपव झरींहेश्रेसू ीराश्रिशी) प्रणाली नांदेडमध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच कार्यान्वित केली जाणार आहे.
रुग्णांच्या आरोग्यविषयक नोंदी या डिजिटल पद्धतीने होऊन एक ’ पेपरलेस डेटा ’ तयार करून त्याचा उपयोग संशोधनाच्या कार्यासाठी केला जाणार आहे. नजीकच्या भविष्यात साकार होणारं हे भव्य रुग्णालय हे केवळ  ‘हाय-फाय’ आणि श्रीमंत वर्गासाठीचं असेल असं नसून समाजातील प्रत्येक आर्थिक स्तरातील वर्गासाठी या हॉस्पिटलचे दरवाजे उघडे राहणार आहेत.  आजचे या हॉस्पिटलचे भूमिपूजन म्हणजे नांदेड येथील आरोग्य सुविधांना एक वेगळं वळण मिळणार, येथील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय परिवर्तन होण्याची नांदी आहे. नांदेडच्या रुग्णसेवा-सुविधांच्या बाबतीत, या इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एक इतिहास रचला जाणार आहे. अशा संकल्पना मनात ठेऊन या हॉस्पिटलची निर्मिती करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. या हॉस्पिटलच्या संचालक मंडळास हे स्वप्न साकार व्हावं यासाठी शुभेच्छा!
- डॉ.किशोर अतनूरकर
    दि. 14 मे 2022

Post a Comment

Previous Post Next Post