महात्मा बसवेश्‍वर यांचे बॅनर फाडून विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करानांदेडच्या बसव जयंती समितीचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांची मागणी
                 
नांदेड दि.17-  बाराव्या शतकात समतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक जगत्‌ज्योती महात्मा बसवेश्‍वर यांच्या नावाचे बॅनर कांही समाजकंटकांकडून उस्माननगर येथे फाडण्यात येवून विटंबना करण्यात आली. ज्यांनी हे दुष्कृत्य केले आहे त्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिस अधिक्षक यांच्याकडे नांदेड येथील महात्मा बसवेश्‍वर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केली आहे.
म.बसवेश्‍वर हे समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी बाराव्या शतकात जातीनिर्मूलन व महिला सक्षमीकरणासाठी काम केले. जगात लोकशाहीचे पहिले बीजे रोवण्याचे काम त्यांनीच केले. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात त्यांच्या विचारास मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे विचार चिरंतन नांदेडकरांपुढे राहावेत यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून नांदेडमध्ये भव्य अशा अश्‍वारुढ पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अशा समाजसुधारकांची विटंबना करणे ही निंदणीय बाब असून दोषींचा शोध घेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष पांडागळे यांनी पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post