जय वकील फाऊंडेशनच्या दिशा प्रकल्पातून मतिमंदांच्या अभ्यासक्रमास मिळाली दिशा - मुख्याध्यापक नितीन निर्मल


 


नांदेड  दि ५, राज्यातील बहुतांश बौद्धिक अक्षम (मतिमंद) विद्यार्थ्यांच्या शाळेचा अभ्यासक्रम सारखा नव्हता. हा अभ्यासक्रम सर्वत्र सारखा असावा यातून या विद्यार्थ्यांचीही शैक्षणिक प्रगती होऊन भविष्यात ते स्वावलंबी जीवन जगत समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी जय वकील फाउंडेशनच्या दिशा प्रकल्पातून मतिमंदांच्या अभ्यासक्रमास निश्चितच दिशा मिळेल असा विश्वास राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी व्यक्त केला आहे. 

येथील मगनपुरा भागातील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात मंगळवार दि. ५ जुलै रोजी जय वकील फाउंडेशनच्या दिशा प्रकल्प व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने नांदेड हिंगोली जिल्ह्यातील सर्व बौद्धिक अक्षम (मतिमंद) शाळेतील मुख्याध्यापक व विशेष शिक्षकाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक नितीन निर्मल बोलत होते याप्रसंगी दिशा प्रकल्पाचे राज्य समन्वयक निलेश चव्हाण विभाग समन्वयक साजिद मुल्ला, विभाग समन्वयक प्रिती कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना मुख्याध्यापक नितीन निर्मल म्हणाले की, सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच या विद्यार्थासाठीही एकच अभ्यासक्रम असणे आवश्यक होते. दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून आता राज्यभरातील अशा सर्व शाळात एकच अभ्यासक्रम शिकवल्या जात आहे. मतिमंद विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही एक चांगली सुरुवात आहे. दरम्यान गत दोन वर्षाच्या काळात कोरोनामुळे सर्वच क्षेत्र प्रभावी झाले. याचा फटका सामान्य असो का विशेष शाळा यातील सर्वच विद्यार्थ्यांना बसला. यातून ऑनलाईन  शिक्षणाचा पर्याय पुढे आला. मात्र मतिमंद विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे असा प्रश्न मतिमंद शाळांच्या विशेष शिक्षकांसमोर निर्माण झाला होता. अशावेळी दिशा प्रकल्पाच्या मार्गदर्शनातून मतिमंद विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा मार्ग मोकळा झाला. 

यावेळी ऑनलाईन समवेतच प्रत्यक्ष मतिमंद विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थ्यांना अध्यापन व त्यांच्या पालकांनाही यात सहभागी करून त्यांच्यातही जागृती निर्माण करण्यात आली. कोरोनानंतर आता प्रत्यक्ष शाळा सुरु झालेल्या आहेत. या विद्यार्थ्यांनाही आता भाषा, गणित, पर्यावरण व विज्ञान आदींचा समावेश असलेले शिक्षण मिळणार असल्याने येणाऱ्या काळात हे विद्यार्थीही स्वावलंबी होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील असा विश्वास मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी केला.

या दिवसभर चाललेल्या मुख्याध्यापक व विशेष शिक्षक यांच्या बैठकीत दिशा वार्षिक कॅलेंडर, मॉडेल स्कुल यावर दिशा प्रकल्पाचे राज्य समन्वयक निलेश चव्हाण विभाग समन्वयक साजिद मुल्ला, विभाग समन्वयक प्रिती कांबळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक व विशेष शिक्षकांनी उपस्थित केलेल्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यात आले. दिशा प्रकल्पाचा अभ्यासक्रम, स्वरूप शिकविण्यासाठी विषयानुरूप अभ्यासक्रम व कार्यपुस्तिका याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. दिशा प्रकल्पाने अनेक तज्ज्ञांच्या अनुभवातून हा अभ्यासक्रम तयार केला असला तरीही मुख्याध्यापकांची भूमिका व विशेष शिक्षकांचे परिश्रम यातूनच याला खऱ्या अर्थाने यश मिळेल असा विश्वास  निलेश चव्हाण यांनी व्यक्त केला. या बैठकीस नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापक व विशेष शिक्षकांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post