खड्ड्यात बसून माजी नगरसेवकाचे आंदोलन परभणी: रस्त्याच्या दुरावस्थेचा निषेध
परभणी/मोहम्मद बारी जिल्हाप्रतिनिधी
शहरातील कारेगाव मार्गावरील देशमुख कॉर्नर परिसरात रस्त्याची अतिशय दुरावस्था होवूनही मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या निषेधार्थ माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांनी देशमुख हॉटेल परिसरात आज मंगळवारी (दि.26) दुपारी 3 वाजता रस्त्यावरील खड्डयात ठाण मांडून आंदोलन केले.
याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ दिवसांपूर्वीच कॉ.राजन क्षीरसागर, अ‍ॅड.माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारण्यात आले. दरम्यान, अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक रस्ता दुरुस्तीची मागणी करत आहेत. देशमुख कॉर्नरपासून जायकवाडी वसाहत, जिल्हा उद्योग केंद्र, सुपर मार्केट तेथून देशमुख गल्लीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. या रस्त्यावर जागोजागी छोट्या-मोठ्या आकाराचे असंख्य खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे व नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत असून या रस्त्यावरून या भागातील नागरिक ये-जा करताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. जुना कारेगाव रोड, उघडा महादेव ते मोठा मारोतीपर्यंत रस्त्याच्या प्रश्नासाठी व्यापारी, वाहन संघटनासह शैक्षणिक संस्था बंद ठेवून उघडा महादेव येथून गणपती मंदिर परिसरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या भागातील संप्तत नागरिकांनी बुधवारी सकाळी देशमुख कॉर्नरजवळील गणपती मंदिरासमोर रस्त्यावरील खड्ड्यात ठिय्या मांडून आंदोलन केले. या आंदोलनात विशाल बुधवंत यांच्यासह नागरिकांनी भाग घेतला.
परभणी शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या मोठा मारुती ते उघडा महादेव या सुमारे अडीच किलोमीटरच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झालेली आहे. या रस्त्याचे काम अथवा दुरुस्ती करावी यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. मात्र आज याठिकाणी या भागातील माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांनी चक्क भर पावसात रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले. एवढेच नव्हे तर रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात ते चक्क झोपून आराम करत आहेत. सध्या महापालिकेवर प्रशासक असून आयुक्त देविदास पवार यांच्याकडे कारभार आहे. बुधवंत यांनी जोपर्यंत आयुक्त स्वतः येऊन दखल घेणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन संपवणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post