नेत्यांच्या बॅनरला सूट तर सैनिकाच्या बॅनरवर कारवाई : मनापाची अजब मोगलाई. नगरसेविका सौ.कोकाटे यांचा संताप,मनपा आयुक्तांना विचारला जाब.
नांदेड दि.6 : शहरातील बॅनरबाजी वर अंकुश लावण्यासाठी महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक कारवाई करताना भेदभाव करत असल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे. त्यात पुन्हा भर पडली असून राजकीय नेत्याच्या बॅनरबाजीला सूट देत सैनिकाच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर मात्र मनपाच्या पथकाने कारवाई केली आहे. महानगरपालिकेच्या या भूमिकेबद्दल नगरसेविका करुणाताई कोकाटे यांनी संताप व्यक्त करत आयुक्तांना जाब विचारला आहे.

शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी आणि विनापरवाना लावण्यात येणाऱ्या बॅनरवर अंकुश लावण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने कारवाईसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. शिवाय महानगरपालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयातूनही अशा बॅनरबाजीवर कारवाई करण्यात येते परंतु दुर्दैवाने गेल्या काही महिन्यापासून नांदेड शहरातील महानगरपालिका प्रशासन काही विशिष्ट राजकीय लोकांच्या बॅनरला सवलत देत असल्याचे दिसून येते . माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे भाग्यविधाते अशोकराव चव्हाण यांनी स्वतः बॅनरलावू नका असे आवाहन केले होते.त्यामुळे आदरणीय चव्हाण यांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनर न लावता लोकौपयोगी उपक्रम राबविले. परंतु दुर्दैवाने विशिष्ट राजकीय नेत्यांच्या बॅनरबाजीला मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाने छुपा पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे नुकत्याच एका बड्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात शेकडो बॅनर लावले होते या बॅनरवर महानगरपालिकेच्या पथकाने कोणतीही कारवाई केली नाही .परंतु  तब्बल 22 वर्षे देशसेवा करून परतलेल्या सैनिकाच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर मात्र तातडीची कारवाई करत महानगरपालिकेने मोठा तीर मारल्याचा आव आणला आहे. वास्तविक आयुष्याच्या उमेदीची २२ वर्षे राष्ट्रीय सेवेसाठी सीमेवर व्यतीत करणाऱ्या वीर जवानांच्या स्वागतासाठी महानगरपालिकेनेच कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित असताना सैनिकाच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर तडकाफडकी कारवाई करत ते बॅनर हटवण्याचे पातक महानगरपालिकेने केले आहे . राजकारण्यांना सूट तर  जवानांच्या बॅनरवर कारवाई महानगरपालिकेच्या या मोगलाई  भूमिकेबद्दल सांगवी प्रभागाच्या नगरसेविका सौ.  करुणाताई कोकाटे यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तातडीने मनपा आयुक्तांनी खुलासा करावा  आणि संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आयुक्ताकडे केली आहे . या प्रकरणी संबधित कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई न केल्यास सर्वसाधारण सभेत हा विषय लावून धरत कायदेशिर कारवाईची मागणी करण्यात येईल असा इशाराही नगरसेविका सौ.करूणाताई कोकाटे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post