नांदेड, लातूर, हिंगोली, परभणीला नवे पोलिस अधीक्षक

 

नांदेड : मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी येथे नवीन पोलिस अधीक्षक येणार आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांची सिंधुदुर्गला पोलिस अधीक्षक पदावर बदली झाली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन अशोक पाटील हे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून औरंगाबादला येत आहेत. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्याचे आदेश काढले आहेत.

नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून बृहन्मुंबईचे पोलिस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली झाली आहे. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांची लातूरला पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.

हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक बाराचे समादेशक संदीपसिंह गिल यांची हिंगोली पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. जालन्याच्या राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक तीनच्या समादेशक श्रीमती रागसुधा आर. यांची परभणीच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची गोंदियाच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, हिंगोलीचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर आणि परभणीचे जयंत मीना यांची बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

पिंगळेंची लातूरमध्ये छाप

लातूर : लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची गोंदियाला बदली झाली असून त्यांच्या जागी गडचिरोलीचे अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे येत आहेत. पिंगळे हे दोन वर्षांपूर्वी येथे रुजू झाले . जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चोखपणे त्यांनी सांभाळली. जिल्ह्यात मोठा जनसंपर्कही त्यांनी तयार केला.

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वारंवार छापे टाकून त्यांनी अवैध धंद्यावर आळा घातला. त्यांच्या काळात जिल्ह्यात घडलेले मोठे व गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश आले. त्यांच्या काळात झालेली विविध आंदोलनेही शांततेत पार पडली. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले राहिल्याने पिंगळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांत पोलिसांबद्दल एक प्रकारे विश्वासाचे वातावरण तयार केले होते.


Post a Comment

Previous Post Next Post