शमी ठरला विजयाचा नायक ऑस्ट्रेलियावर टीम इंडियाचा रोमहर्षक विजय!

 टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीआधी भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला सराव सामना खेळला. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाशी दोन हात केले.

फलंदाजांनी धावफलकावर सन्मानजनक धावसंख्या लावल्यानंतरही गोलंदाजांनी अपेक्षित 
कामगिरी केली नाही. मात्र, सामन्यातील अखेरचे व आपले पहिले षटक टाकत असलेल्या मोहम्मद शमीने 11 धावांचा बचाव करून 6 धावांनी विजय भारताच्या पारड्यात टाकला.


या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरूद्ध संथ खेळीमुळे टिकेचा धनी बनलेल्या केएल राहुलने या सामन्यात आक्रमक फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्मा याला खाते उघडण्यासाठी पाचवे षटक लागले. राहुल 33 चेंडूवर 57 धावांची वेगवान खेळी करून बाद झाला. त्या पाठोपाठ रोहित व विराट कोहली यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा देखील लौकीकास साजेसा खेळ करू शकला नाही. त्याने केवळ 2 धावा केल्या. दिनेश कार्तिक याने 20 धावांचे योगदान दिले.

मागील जवळपास वर्षभरापासून चमकदार कामगिरी करत असलेल्या सूर्यकुमार यादवने या सामन्यातही भारतीय संघाची जबाबदारी घेतली. त्याने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी 33 चेंडूवर शानदार अर्धशतकी खेळी केली. परिणामी, भारतीय संघाने 7 बाद 186 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली.


या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ऍरॉन फिंचसह मिचेल मार्शला संधी दिली. मार्शने अवघ्या 18 चेंडूंवर 35 धावांचा तडाखा दिला. स्मिथ 11, मॅक्सवेल 23 व‌ स्टॉयनिस 7 करून तंबूत परतले. असे असताना कर्णधार फिंचने जबाबदारीने खेळ केला. त्याने 54 चेंडूवर 79 धावांची आश्वासक खेळी केली. विराट कोहलीने टीम डेव्हिडला 5 धावांवर बाद करत सामन्यात रंगत आणली. हर्षल पटेलने नियंत्रित गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले. अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी रोहित शर्माने शमीच्या खांद्यावर दिली. सामन्यातील आपले पहिले षटक टाकत असलेल्या शमीने केवळ 4 धावा देत भारतीय संघाला विजयी केले. त्याने एकाच षटकात तीन बळी मिळवत संघातील आपली निवड सार्थ ठरवली

Post a Comment

Previous Post Next Post