मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद, फडणवीस तातडीने दिल्लीला रवानाहाराष्ट्राच्या सत्ता संघर्षानंतर झालेल्या सत्तांतरा नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

पोलिसांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून (Transfers of Police and Officers) मतभेद झाल्याचे समजत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीसाठी गेल्याचे वृत्त आहे.

मुंबई - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलिसांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीसाठी गेले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीतील माघार व कार्यकर्त्यांनी दाखवलेली नाराजी हासुद्धा विषय असु शकतो असे जाणकार व्यक्त करत आहेत. राज्यात अलीकडे सनदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्या असल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

शनिवारी वर्षावर बैठक: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या वेळी विविध विषयांसह पोलिसांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाली. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आले त्यालाही आता शंभर दिवस उलटून गेले. मात्र बदल्यांचा विषय अजून मार्गी लागलेला नाही आहे. यावरून उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी नाराजी व्यक्त केली. ते स्वतः गृहमंत्री असल्याने त्यांच्याकडे याबाबत वारंवार विचारणा होत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे अनेकदा कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीत त्याबद्दल सुद्धा फडवणीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. हम साथ साथ है, म्हणणारे अल्पावधीतच दूर जातात की काय? अशी शंका निर्माण झाल्याची चर्चा विरोधकांत आहे.

अधिकाऱ्यांना अधिक महत्त्व : राज्यातील प्रशासनामध्ये प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या पाठोपाठ पोलीस अधिकाऱ्यांचा क्रमांक लागतो. विविध शहरातील पोलीस आयुक्त आणि त्या पाठोपाठ जिल्हा पातळीवर पोलीस अधीक्षक यासारख्या पदांवरील अधिकाऱ्यांना अधिक महत्त्व असते. निवडणूक प्रचार दरम्यान पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची असते. प्रचारा दरम्यान सभा रॅली चौकातील पदसभा यासाठी लागणाऱ्या परवानग्यांपासून ते कायदा सुव्यवस्था राखण्याच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना पाठवल्या जाणाऱ्या नोटिसा या माध्यमातून प्रचारावर नियंत्रण मिळवता येते. याशिवाय आमदार तसेच खासदारांचे मतदारसंघातील वजन वाढवायचे असेल तर संबंधित ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या तक्रारींचा किती जलद गतीने निपटारा होतो हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. साहजिकच पोलिसांच्या बदल्यांमध्ये राजकारणांचे स्वारस्य असते. यासाठी या बदल्यांवरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जात आहे.


रविवारी एकत्र येणे टाळले : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाराजगी असल्याने त्यांनी रविवारी एकत्र येणे सुद्धा टाळले होते. रविवारी सकाळी राजभवन येथे स्टार्टअप यात्रांमधील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्याचा तर ठाण्यात श्रीमद् भागवत कथा ज्ञान महायज्ञाचा व सायंकाळी ठाण्यातच ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आयोजित भव्य सत्कार समारंभ असे मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे एकत्र तीन कार्यक्रम होते. मात्र या तिन्ही कार्यक्रमांपैकी एकाही कार्यक्रमाला हे दोघे एकमेकांसमोर आले नाहीत. बंजारा सेवा संघाच्या तिसऱ्या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली मात्र वेगवेगळी.


कारभारात उपमुख्यमंत्रीच वरचढ : नाट्यमय सत्तांतरानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार एकत्र आले असले तरीसुद्धा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना विराजमान करून भाजपने सत्तेची चावी आपल्याकडेच ठेवली आहे हे जवळपास आता स्पष्ट होत येत आहे. शिंदे सरकार मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. जेव्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकत्र येतात किंवा पत्रकार परिषद घेतात तेव्हा त्यात उपमुख्यमंत्रीच सरस ठरतात याचा प्रत्यय वारंवार दिसून येत आहे.


एकनाथ शिंदेंवर टीका : पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हातून उपमुख्यमंत्र्यांनी माईक खेचून घेतल्यावरून विरोधकांनी या सरकारवर विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. काही दिवसापूर्वी एका खाजगी कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एकत्र मुलाखत घेतली होती या मुलाखतीत सुद्धा टेंडर बाबत पाच वर्षाच्या अटीबाबत एक प्रश्न नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्यानंतर त्यास उत्तर देत असताना ही अट ठेवणे गरजेचे असल्याचे एकनाथ शिंदे सांगत होते, त्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हात धरला हा सुद्धा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता.

तेरी भी चूप और मेरी भी चूप: अशा एक ना अनेक वारंवार होणाऱ्या गोष्टी ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सुपर सीएम होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याबाबत शिंदे गटाच्या आमदारांनी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत असेही समजते. उपमुख्यमंत्री हे माजी मुख्यमंत्री राहिल्याने त्यांची प्रशासनावर कमालीची पकड आहे. फडणवीस यांचा वापर सध्या सुपरसीएम सारखाच आहे हे सुद्धा शिंदे यांना खटकत आहे. म्हणूनच, सध्याच्या राजकारणात "तेरी भी चूप और मेरी भी चूप", असं हे म्हणत असले तरी या दोघांमधील नाराजगी आता उघड होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post