मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाणे भोवले, जयदत्त क्षीरसागर यांची सेनेतून हकालपट्टी, बीडमध्ये खळबळ

 


बीड, 22 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधणे शिवसेनेचे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना चांगले भोवले आहे. जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकलपट्टी केल्याची घोषणा बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली आहे.

या घोषणेमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बीड शहरातील सिमेंट रस्ता व नालीच्या 70 कोटींच्या विकास कामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आलं होतं. जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे आज जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर यांच्यावर कारवाईची घोषणा केली.

जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना जयदत्त क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. मुंबईत जाऊन त्यांची कधी भेट घेतली नाही. नुकत्याच केलेल्या उद्घाटनात कुठेही त्यांचा उल्लेख केला नाही. ही खंत वाटल्यामुळे यापुढे त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली.

येणाऱ्या निवडणुका आम्ही आमच्या ताकदीवर लढवणार आहोत, असंही बीड शिवसेनाप्रमुख अनिल जगताप यांनी केली. तसंच, सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. अनेकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार आहोत, असंही जगताप म्हणाले.

यावेळी संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, अप्पासाहेब जाधव, बाळासाहेब पिंगळे, परमेश्वर सातपुते, विलास महाराज शिंदे, दिलीप गोरे, सुनील सुरवसे, सागर बहिर यांची उपस्थिती होती. 
जयदत्त क्षीरसागर यांचं काय चुकलं? दोन दिवसांपूर्वी, बीड नगरपालिकेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नालीच्या 70 कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस,युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर, राज्याचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जयदत्त क्षीरसागर यांनी हजेरी लावल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले होते.

Post a Comment

Previous Post Next Post