ठेकेदाराला अभय देण्यासाठी हिमायतनगर शहरातील वीजचोरीचा पंचनामा परस्पर केला - दिलीप शिंदेतक्रारदाराच्या समक्ष पंचनामा नं केल्याने उपअभियंत्याच्या बाबतीत दिली तक्रार
स्वतःच्या अंगावर हे प्रकरण येऊ नये म्हणून अभियंता भडंगे यांनी केला सर्व खटाटोप

हिमायतनगर| शहरातील संभाजी नगर भागात दि.१८ रोज शुक्रवारी दिवसाढवळ्या मुख्य वीजप्रवाहावरून आकोडा टाकून चोरीच्या पद्धतीने वीज वापरत असल्याची पोलखोल आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी  उघड केली. परंतु ज्यांनी वीजचोरी पकडून दिली त्यांना विश्वासात न घेता हिमायतनगरच्या महावितरण कार्यालयातील उपअभियंत्याने परस्पर वीजचोरीचा पंचनामा चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करणाऱ्या दोन कर्मचाऱ्याच्या स्वाक्षरीने ऑनलाईन पाठविला असल्याचे सांगितले आहे. गेल्या ३ वर्षांपासून होत असलेला चोरीचा प्रकारावर पांघरून घालत संबंधित वीजचोराला अभय देण्याचा प्रकार आहे. स्वतःच्या अंगावर हे वीजचोरीचे प्रकरण येऊ नये म्हणून अभियंता भडंगे यांनी केलेला सर्व खटाटोप आहे. त्यामुळे नियमाने वीजबिल भरणाऱ्या नागरिकांना या ओव्हरलोड प्रकारामुळे खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. असेही आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे.  

शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून १९ कोटी रूपयांची प्रभावी योजना मंजुर झाली. या नळयोजनेचे काम एमटीफड या कंत्राटदाराकडून केले जात आहे. नळयोजनेच्या कामात पालथी अनियमितता असून, अंदाजपत्रकाच्या बगल देऊन संत गतीने काम केले जात आहे. अद्यापही नळयोजनेच्या जलकुंभाचे काम पूर्ण झाले नसताना शहरात नळयोजनेच्या पाईपलाईनचे काम कोट्यवधींच्या निधीतून करण्यात आलेली सिमेंटची रस्ते मधोमध फोडून केली जात आहेत. एव्हडेच नाहीतर विजेची चोरी करून यासाठील लागणारी प्लॅस्टीच्या पाइपची जोडणी केली जात आहे. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून शहरात सुरु असताना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यावर याचा परिणाम होत असून, यामुळे नियमाने वीजबिल भरणाऱ्या शेतकरी व्यापारी, नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. यास केवळ अवैद्य रित्या होत असलेल्या वीजचोरीचा प्रकार कारणीभूत असल्याचे अनेकजण बोलून दाखवीत आहेत.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वीजचोरीची पोलखोल करण्याचे ठरवून याकडे लक्ष ठेऊन होते. दि.१८ शुक्रवारी शहरातील संभाजी नगर भागात विजेची मुख्य प्रवाह तीरावरून चोरी करून पाईप जोडणीचे काम सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे, शहराह्द्यक्ष अनिल नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चोरीने वीज वापरात असल्याच्या ठिकाणी जाऊन याबाबतची माहिती महावितरणचे उपअभियंता व उपकार्यकारी अभियंता यांना दिली होती. त्यावरून अभियंत्यांनी चोरीच्या वीज वापर होत असलेल्या घटनास्थळावर महावितरणच्या दोन कर्मचाऱ्याला पाठवून वीज चोरीसाठी वापरलेले केबल आणि पाईप जोडण्याची मशीन जप्त केली आहे. यावेळी घटनास्थळावर पंचनामा करण्याचा आग्रह आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र येथील महावितरण कार्यालयातील उपअभियंता भडंगे यांनी मी व्हीसी मीटिंगमध्ये आहे नंतर पंचनामा करू असे म्हणत जप्त केलेले साहित्य कार्यालयात मागून घेतले.

त्यानंतर तरी वीज चोरी पकडून दिली त्यांच्या उपस्थितीत या चोरीच्या घटनेचा पंचनामा करून गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या वीज चोरीचा आढावा घेत त्यानुसार संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र सायंकाळपर्यंत व्हीसी चालू आहे याचे कारण समोर करून उपअभियंत्याने पंचनामा केलाच नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शनिवारी आणि तिसऱ्या दिवशी रविवारी सुद्धा सुट्टी होती. याबाबत पत्रकारांनी रविवारी उपअभियंत्यास दूरध्वनीवरून विचारले असता आम्ही पंचनामा केला आहे असे सांगून माहिती देता येत नाही म्हणत टाळाटाळ केली. त्यानंतर सोमवारी महावितरण कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता सोमवारी स्वतः उपअभियंता भडंगे यांनी सांगितले आमच्या दोन कर्मचाऱ्यांच्या सह्या घेऊन आम्ही ऑनलाईन पंचनामा करून पाठविला आहे आता वरिष्ठ स्तरावरील अधिकारी याबाबत काय दंड लावतीळ हे सांगता येत नाही असे म्हणत वीजचोरीच्या कार्यवाहीच्या बाबतीत सखोल माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.

त्यानंतर दि.२१ सोमवारी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालयात जाऊन उपअभियंता भडंगे यांच्या विरोधात कार्यवाहीच्या बाबतीत संत गती अवलंबविल्या बद्दल तक्रार दिली आहे. दिलेल्या निवेदनात उपअभियंता भडंगे हे कार्यवाहीसाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच महावितरणचे उपअभियता हे वादग्रस्त ठरत असून, श्री भडंगे यांची नियुक्ती पासूनची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. तसेच वीजचोरी प्रकरणी एमटी फड कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करावी. दंड नं भरल्यास वीज चोरी करून शासनाला चुना लावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

हिमायतनगर शहरात पाणीपुरवठ्याचे काम अनेक वर्षापासून चालू आहे. मात्र महावितरण कंपनीकडे संबंधित ठेकेदाराने वीज वापराचे कोणती परवानगी घेतली नाही. परवानगी न घेता काम कसे चालू आहे याबाबत उपअभियंता तथा स्थानिक कनिष्ठ अभियंता भडंगे यांनी याबाबत कधीच का..? विचारणा केली नाही. एवढ्या वर्षांपासून वीज चोरी होत असताना बघ्याची भूमिका कशासाठी..? घेतली असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. एकूणच हा सर्व चोरीचा प्रकार उपअभियंता यांच्या संमतीनेच होत होता काय...? आजच्या परिस्थितीला आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वीज चोरी पकडून दिली नसली असती तर हा वीज चोरीचा प्रकार असा सुरू राहिला असता का..? अशा विविध प्रश्नांनी नियमित वीज बिल भरणाऱ्या विज ग्राहकांना हैराण केले आहे. एकूणच अश्या प्रकारे नळयोजनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या वीज चोरीचा भार शहरातील स्थानिक वीज ग्राहकांवर पडणार याचे चित्र उघडपने दिसून येत आहे.

या संदर्भात अभियंता भडंगे यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधून विचारणा केली असता आम्ही अगोदरच पंचनामा केला. यासाठी आमचे दोन कर्मचारी बस झाले इतर कोणाची आवश्यकता नव्हती. त्यामुळे आम्ही पंचनामा ऑनलाईन पाठविला असे सांगून हात झटकले आहेत. दंड किती लावला असे विचारले असता ते सर्व ऑनलाईन प्रोसिजर मधील कार्यक्रम आहे. मी आता काही सांगू शकत नाही तुम्ही त्याच दिवशी जर मला विचारले असते तर सर्व काही सांगितलं असतं..? असं ते म्हणाले. 

Post a Comment

Previous Post Next Post