राजस्थानी शिक्षण संस्थेचे शैक्षणिक गुणवत्तेसह, आरोग्य क्षेत्रातही प्रशंसनीय कार्य - न्या. इंदापुरे
नांदेड दि. २३, दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कामासमवेत या विद्यार्थ्याच्या आरोग्याबाबतही सजग असत नियमित आरोग्य शिबिरात विद्यार्थ्याची तपासणी व उपचार असे राजस्थानी शिक्षण संस्थेचे कार्य प्रशंसनीय असल्याचे गौरोद्गार येथील तदर्थ जिल्हा न्या. इंदापुरे यांनी काढले आहे.

          जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, स्प्रिंग व्हिजन फाउंडेशन, लायन्स क्लब व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिव्यांग सेवा पंधरवाडा निमित्त  बुधवार दि. २३ नोव्हेबर रोजी येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात नांदेड तालुक्यातील दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यासाठी दंत चिकित्सा व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय समारोपात तदर्थ जिल्हा न्या. इंदापुरे बोलत होत्या व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. दलजितकौर जज, संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, प्र. उपाध्यक्ष कमल कोठारी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, बनारसीदास अग्रवाल, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अनिल देवसरकर, लायन्स क्लब चे नागेश कदम आदींची उपस्थिती होती.

          यावेळी पुढे बोलताना न्या. इंदापुरे म्हणाल्या की, कोणतेही कार्य करताना त्याबाबतची तळमळ असल्यानंतरच कार्य यशस्वी होते. राजस्थानी शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी व शिक्षकांच्या परिश्रमातूनच दिव्यांगांच्या शिक्षण व पुनर्वसनाचा प्रश्न सुकर होत आहे. दिव्यांग (गतिमंद) शाळेच्या तपासणी साठी आपण अनेक शाळात जातो मात्र अन्य शाळांच्या तुलनेत या शाळेत सूचनांची तातडीने अंमलबजावणी होते. यापुढेही या संस्थेने समाज हितासाठीचा उपक्रम असाच राबवावा असे आवाहन केले.

          याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. दलजितकौर जज म्हणाल्या की भविष्यातील विद्यार्थ्याची गरज व येणारी अडचण पाहता वेळीच उपाययोजना या शाळेत होत असते. यातूनच ही शाळा शैक्षणिक, आरोग्य आदि उपक्रम यशस्वी रीत्या पार पडत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी शिक्षणासह विद्यार्थी निरोगी व सुदृढ राहावा यासाठी संस्था कार्य करित असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. मराठी माध्यमाची शाळा, काळाची गरज लक्षात घेत इंग्रजी माध्यमाची शाळा व दिव्यांग शाळा सुरु करण्यात आली. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच न देता त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येते. दिव्यांग शाळेत शिक्षण घेतलेले बहुतांश विद्यार्थी खाजगी व शासकीय नौकरीच्या माध्यमातून स्वावलंबी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर गोडबोले तर उपस्थितांचे आभार मुरलीधर पाटील यांनी मानले. या आरोग्य शिबिरात तब्बल ३०० विद्यार्थ्याची दंत चिकित्सा व नेत्र तपासणी करण्यात आली.  

Post a Comment

Previous Post Next Post